बहुचर्चित बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून उमेदवार जाहीर करण्याकडे राष्ट्रीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर भाजप गोटात दस्तुरखुद्द माजी मुख्यमंत्र्यांनाही खासदारपदाच्या शर्यतीत ओढले गेले होते. अद्याप भाजपच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब झाले नसून उमेदवार कोण असेल? याकडे साऱ्यांच्या नजर खिळल्या आहेत.
इच्छुकांनी मात्र आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी हायकमांड चरणी साकडे घातल्याचे वृत्त हाती आले असून हायकमांडची मनधरणी करण्यास इच्छुकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली आहे! तसेच संघ परिवाराच्या नेत्यांचीही मनधरणी इच्छुकांच्यावतीने करण्यात येत आहे. निवडणुकीची तारीख आणि उमेदवार घोषणेचे काउंट डाऊन बेळगावमध्ये सुरु झाले असून निवडणुकीपेक्षाही उमेदवार घोषणेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी आपल्या सुनेला म्हणजेच सुरेश अंगडी यांची कन्या श्रद्धा अंगडी यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर रमेश जारकीहोळी यांनी अंगडी कुटुंबातील अमरनाथ यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. उमेश कत्ती यांनी त्यांचे बंधू रमेश कत्ती यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले असल्याची माहिती पुढे आली आहे. वरील तिन्ही मंत्र्यांना हायकमांडने उमेदवार निवडीसाठी जबाबदारी दिली आहे परंतु त्यांनी सुचविलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येईल कि नाही, याबाबत साशंकता आहे. लोकसभेसाठी जवळपास २५ हुन अधिक दिग्गज मान्यवरांचे अर्ज भाजपाकडे आले असून यामध्ये डॉ. प्रभाकर कोरे, रमेश कत्ती आणि अमरसिंह पाटील या तीन माजी खासदारांचा समावेश आहे. तर संजय पाटील, विश्वनाथ पाटील, जगदीश मेटगुड या तीन माजी आमदारांचा समावेश आहे. यासह डॉ. गिरीश सोनवलकर, डॉ. रवी पाटील, डॉ. सोनाली सरनोबत या तीन प्रतिष्ठित डॉक्टरांचाही समावेश आहे. यांच्यासह माजी आमदार डॉ. विशवनाथ पाटील यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. यांच्यासोबत कर्नाटकचे दिल्ली विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, ऍड. एम बी. जिरली., भाजप माजी जिल्हाध्यक्ष उज्वला बडवाणाचे,सुरेश अंगडी यांची कन्या श्रद्धा, माजी मनपा अध्यक्ष राजेंद्र हरकूनी, विरेश किवडसण्णवर, किरण जाधव, दीपा कुडची, महांतेश वकुन्द, भारती मगदूम, राजीव टोपण्णावर, पांडुरंग रड्डी, रमेश देशपांडे, रुद्रना चंदरगी, निखिल ओसवाल अशा अनेकांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे.
भाजपच्या राजकीय सूत्रांकडून हाती आलेल्या माहितीनुसार भाजपच्या तीन प्रभारी मंत्र्यांनी आपल्या कुटुंबियांना उमेदवारी मिळण्यासाठी धडपड करत असल्याचे समजले आहे. हायकमांडने उत्तम उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी नोटीस बजावली आहे, असेही वृत्त हाती आले आहे. परंतु राजकारणात कधी काय घडेल? याचा नेम नाही. हायकमांडने उमेदवारी निश्चित केल्याचेही वृत्त हाती आले असून इच्छुकांच्या भाऊगर्दीत नेमकी कुणाच्या पदरात उमेदवारी पडेल? याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.


