बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा (बीसीसीआय) वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आज गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.
उद्यमबाग येथील बीसीसीआयच्या श्री रावसाहेब गोगटे सभागृहांमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी आणि सन्माननीय अतिथी म्हणून डीआयसी बेळगावचे संयुक्त संचालक दोड्डबसवराज उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष पंचाक्षरी चोण्णद यांनी प्रमुख पाहुणे इराण्णा कडाडी यांचा सत्कार केला.
संघटनेचे सेक्रेटरी किरण अंगडी यांनी पुरस्काराच्या निकषांबद्दल आणि देणगीदारांबद्दल माहिती दिली. जॉईंट सेक्रेटरी प्रभाकर नागरमुन्नोळी यांनी प्रमुख पाहुणे कडाडी यांचा परिचय करून दिला.
यावेळी तीन विभागात पुढीलप्रमाणे पुरस्कार प्रदान केले गेले. दिलीप दामले मेमोरियल ट्रस्ट पुरस्कार (अत्युत्तम औद्योगिक उत्पादन) -अभिषेक एलाॅय प्रा. लि.चे माधव आचार्य, बसाप्पा बाळप्पा कग्गणगी मेमोरियल फंड पुरस्कार (उत्कृष्ट व्यापारी) -सुंदरलाल कांतीलाल अँड कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार दीपक ठक्कर आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्रीमती हितल ठक्कर, श्री मधुकर विठ्ठल हेरवाडकर पुरस्कार (उत्कृष्ट उदयोन्मुख व्यापारी) -मे. आय बॉक्स बेळगावचे मेघन सुनील नाईक.
यावेळी बोलताना डीआयसी बेळगावचे संयुक्त संचालक दोड्डबसवराज यांनी समाजातील सर्व थरांतील लोकांच्या उन्नतीसाठी सरकार विविध योजना राबवित असल्याचे सांगितले. इराण्णा कडाडी यांनी सत्कारालाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच व्यापारी आणि उद्योजकांमध्ये पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत या धोरणाचे महत्त्व देखील विषद केले. केंद्र सरकार देशातील जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटत असल्याचे सांगून प्रत्येकाच्या सामाजिक जबाबदारीबद्दल कडाडी यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम संयोजक समितीचे अध्यक्ष संजय पोतदार यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रातील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.