बस चालकाने घाटात आपल्याला ओव्हरटेक केले या क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या ट्रक चालकाने आपल्या मालक आणि अन्य सहकाऱ्यांकरावी बस अडवून बस चालकाला मारहाण केल्याची आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावल्याची घटना आज दुपारी इंडाल फॅक्टरीनजीक महामार्गावर घडली.
मारहाण झालेल्या बस चालकाचे नांव सुभाष चौगुला (रा. यमकनमर्डी) असे आहे. सुभाष हे वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या कारवार डेपोमध्ये बस चालक आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, सुभाष चौगुला हे पुणे -कारवार ही आपली बस घेऊन कारवारच्या दिशेने निघाले होते. निपाणी घाटात समोरील एक ट्रक चालक त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाण्यास जागा देत नव्हता.
तथापि मोठ्या कौशल्याने त्या ट्रकला ओव्हरटेक करून चौगुला आपल्या बससह बेळगावला आले. दरम्यान ओव्हरटेक करून आलेल्या ट्रक चालकाने बेळगाव येथील आपल्या मालकाला दूरध्वनीवरून बस अडविण्यास सांगितले.
ट्रक चालकाने सांगितल्याप्रमाणे इंडाल फॅक्टरीनजीक राष्ट्रीय महामार्गावर पुणे -कारवार बस अडविण्यात आली. तसेच संबंधित ट्रकचालक त्यांचा मालक क्लिनर अशा चौघापाच जणांनी बसचे चालक सुभाष चौगुला यांना बसमधून बाहेर खेचून त्यांच्यावर हल्ला चढविला.
चौगुला यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना मारहाण करताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन देखील हिसकावून घेण्यात आली आहे. आपल्याला मारहाण झाल्याप्रकरणी सुभाष चौगुला यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. माळ मारुती पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.