कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे आरोग्य आता खालावले असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपल्या नातवंडांसमवेत वेळ घालवावा, असा टोला बसनगौड पाटील-यत्नाळ यांनी लगावला आहे.
चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर येथील जवगोंडनहळ्ळी गावात शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असून येडियुरप्पांचे कुटुंबीय सरकारी कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप बसनगौड पाटील यांनी केला आहे.
येडियुराप्पांचे आता वय झाले असून त्यांचे आरोग्य खालावले आहे. दमलेल्या अवस्थेतील मुख्यमंत्री सकाळी एक आणि संध्याकाळी एक वक्तव्य करतात. त्यांना विश्रांतीची सक्त गरज असून त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी असा सल्ला देत येडियुराप्पांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांचा मुलगा विजयेंद्र आता हळूहळू राजकारणात सक्रिय होत असून त्यांचा मुलगा विजयेंद्र थेट कावेरी या गृहकचेरीतून सर्व कारभार सांभाळत आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांना राजकारणात बळकटी देण्यासाठी येडियुरप्पा खुर्चीवर टिकून आहेत.
हायकमांडला हे सर्व माहित आहे. आणि हा प्रकारदेखील हायकमांड खपवून घेत आहे. येडियुरप्पा आता थकले असून त्यांनी आता विश्रांती घ्यावी, अशी प्रतिक्रिया बसनगौड पाटील यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले कि, मंत्रिपदासाठी मी येडियुरप्पांच्या घरी जाऊन हात पाय पसरणार नाही. मी माझ्या हिंमतीवर मंत्री होईन. पंचांसाली समुदाय सभेसंदर्भात अद्याप कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. आमच्या समाजाचे सामर्थ्य दाखविण्यासंदर्भात बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पंचमसाली समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात बैठक घेऊन लवकरात लवकर निर्णय देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.