बेळगाव महानगरपालिका आवारातील राष्ट्रध्वजासमोर अनाधिकृत लाल-पिवळा ध्वज फडकावून तिरंग्याचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि संबंधित लाल -पिवळा ध्वज हटवावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली वरील मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकार्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या 28 जानेवारी रोजी कांही समाजकंटकांनी महापालिकेच्या आवारातील राष्ट्रध्वजासमोर लाल -पिवळ्या रंगाचा अनाधिकृत ध्वज फडकविला आहे. या ध्वजाला केंद्राचीच नव्हे तर राज्य सरकारची देखील अधिकृत मान्यता नाही. ही वस्तुस्थिती असताना गेल्या 28 रोजी पोलिसांसमक्ष लाल -पिवळा ध्वज फडकविण्यात आला. पोलीस देखील या गैरप्रकाराला आळा घालण्यात असक्षम ठरल्याचे दिसून आले.
या पद्धतीने राष्ट्रध्वजासमोर एखादा अनाधिकृत ध्वज फडकवणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. समाजकंटकांची ही कृती भारतीय तिरंगा ध्वजासंदर्भातील 1950 (नं. 12, 1950), 2002 या संकेताचा आणि राष्ट्र सन्मानाचा अपमान प्रतीबंधक कायदा 1971 या कायद्याचा भंग करणारी आहे. बेळगावातील समाजकंटकांच्या या गैरकृत्यामुळे बेळगावसह देशातील एकात्मतेला बाधा पोहोचली आहे. यासंदर्भात दाखला द्यावयाचा झाल्यास 19 नोव्हेंबर 2012 रोजी उच्च न्यायालयाच्या एका खटल्यात न्या. विक्रमजीत सेन आणि न्या. बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाने राष्ट्रध्वज हा सर्वोच्च असून त्याच्या समोर कोणताही अन्य ध्वज लावला जाऊ नये असा निकाल दिला आहे.
तेंव्हा बेळगाव महापालिका आवारातील राष्ट्रध्वजासमोर अनाधिकृत लाल पिवळा ध्वज फडकवणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित अनाधिकृत ध्वज तात्काळ हटवावा, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह मदन बामणे,आर आय पाटील कार्याध्यक्ष धनंजय पाटील व यांच्यासह युवा समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाची प्रत देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना देखील धाडण्यात आली आहे.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1296909667333290/