येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवीची ओटी भरणे व राखणीचा नारळ वाढविणे असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांनी समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शपथ घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही दिली.
येळ्ळूर (ता. बेळगाव) येथील श्री चांगळेश्वरी देवी मंदिरामध्ये काल शुक्रवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग म. ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी हे होते. प्रारंभी सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य राकेश परीट, अनुसया परीट, सोनाली येळ्ळूरकर, वनिता समीर परीट, जोतिबा परशराम चौगुले, शालन तानाजी पाटील, सतीश बी. पाटील, मनिषा मनोहर घाडी, परशराम लक्ष्मण परीट, दयानंद विलास उघाडे, महेश हनुमंत कानशिडे, लक्ष्मी भरत मासेकर, पार्वती जयसिंग रजपुत, प्रमोद पाटील, सुवर्णा कृष्णा बिजगरकर आणि रूपा पुण्यण्णावर यांचा भगवा फेटा बांधून अध्यक्ष शांताराम कुगजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष राजू पावले, विलास घाडी, दत्ता उघाडे, रामदास धुळजी, मनोहर घाडी व सुरज गोरल यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून आपले मार्गदर्शनपर विचार मांडले. नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्यांच्यावतीने प्रमोद पाटील, महेश कानशिडे, सौ. लक्ष्मी भरत मासेकर आणि सतीश पाटील यांची सत्काराला उत्तर देणारी भाषणे झाली.
याप्रसंगी उपसेक्रेटरी शिवाजी कदम यांनी बेळगाव महापालिकेसमोर अनधिकृत ध्वज फडकविण्याची कृती घटनाबाह्य असल्याचे सांगून त्याच्या निषेधाचा ठराव मांडला.
हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. कार्यक्रमास शिवाजी सायनेकर, सुभाष धुळजी, उदय जाधव, कृष्णा बिजगरकर, महेश जाधव, जयसिंग रजपुत, भरत मासेकर, भीमा पुण्यण्णावर, नारायण कुंडेकर, वाय. सी. इंगळे, बाळू पाटील, अनंत पाटील आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. अखेरीस कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांनी सर्वांचे आभार मानले.