सौंदत्ती तालुक्यातील चचडी क्रॉसनजीक रविवारी झालेल्या भीषण अपघातात महिला पीएसआय कुटुंबावर काळाने घातला. अवघ्या चार दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या नवदांपत्यासह बेळगावमधील महिला पीएसआयचा करुण अंत झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रेणुका देवीच्या दर्शनासाठी नवदांपत्यासहित सौंदत्ती येथे गेलेल्या खडेबाजार, एपीएमसी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका लक्ष्मी नलवडे – पवार (वय ५९) यांची कार आणि समोरून येणारी राज्य मार्ग परिवहनची बस यामध्ये भीषण टक्कर होऊन अपघात घडला. सौंदत्ती तालुक्यातील चचडी क्रॉसजवळ झालेल्या अपघातात नलवडे यांच्यासह त्यांचा मुलगा प्रसाद पवार(वय २८) , सून अंकिता पवार (वय २५) (सर्व राहणार सह्याद्रीनगर) आणि दीपा शहापूरकर (वय ३०, रा. भाग्यनगर) यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
परिवहन महामंडळाची वास्को-इलकल मार्गाची बस गोव्याहून बेळगावमार्गे इलकलकडे निघाली होती. कारशी धडक झाल्यानंतर कार बसखाली अडकली. या अपघातात कारची समोरील बाजू बसखाली गेल्याने कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य हाती घेतले. संपूर्ण कार बसमध्ये घुसल्याने आत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागला. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे बस बाजूला घेण्यात आली यामुळे बसमधील प्रवासी मात्र सुखरूप राहिले.
या अपघातात मृत्यू झालेल्या महिला उपनिरीक्षिका लक्ष्मी नलवडे या येत्या २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होणार होत्या. यापूर्वी मुलाचा विवाहसोहळा उरकून आनंदाच्या वातावरणात असलेल्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.