कंग्राळी खुर्द (ता. बेळगाव) या गावच्या हद्दीतील मार्कंडेय नदीवरील पुलावरून मेलेली जनावरे ( रेडके ) नदीपात्रात टाकल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून ग्राम पंचायत प्रशासनाने दोषींचा शोध घेऊन कडक कारवाईची मागणी केली आहे.
सध्या मार्कंडेय नदीला अलतगा क्राॅसजवळ फळ्या घालून शेतकऱ्यांच्या हितासाठी पाणी अडवलेले आहे. मुळात बेळगांव शहर परिसराच्या उत्तर भागातून येणाऱ्या सांडपाण्यामुळे नदीतील पाणी दुषीत झाले आहे आता यात भर म्हणून ही अशी मेलेली रेडके टाकली जात आहेत. दोन ठिकाणी पोत्यात बांधून तर एका ठिकाणी तसेच ही मृत रेडके टाकली आहेत . या जनावरांचे अवशेष खाण्याच्या नादात भटकी कुत्री , कावळे व अन्य पक्षी ते अवशेष नदी पात्राबाहेर टाकत आहेत . याच ठिकाणी नदीकाठावर कंग्राळी गावाला पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी असलेने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नवजागृती संघाच्या सभासदांनी पीडीओ आर. एम. फगरे यांची भेट घेऊन याबाबत गावात जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्यानुसार उद्या बुधवारी गावात रिक्षा फिरवून स्पीकरवर सूचना देण्यात येतील त्याप्रमाणे नदीत मृत जनावरे कोणी टाकली याचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार असून दोषी सापडल्यास कडक कारवाईचे आश्वासन पीडीओ आर. एम. फगरे यांनी दिले आहे.
दरम्यान, अलतगा क्राॅसजवळ फळ्या घालून अडवलेल्या पाण्यावर सध्या जलपर्णीचा विळखा असून दुर्गंधीही वाढली आहे. तेंव्हा मागील वर्षाप्रमाणे आता एकदा फळ्या मोकळ्या करून दोन दिवस पाणी वाहते केले तर दुर्गंधी कमी होऊन नवीन पाण्याचा साठा होईल व दुर्गंधी कमी होईल, अशी मागणी शेतकरीवर्गाने केली आहे.
यासंदर्भात बोलताना मुळात या साठणाऱ्या पाण्यात कोणतीही प्रकिया न करता शहरातील सांडपाणी मिसळते. त्यामुळे पाणी दुर्गंधी युक्त आहे. नदीत सांडपाणी सोडण्याचे कृत्यच अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया निवृत् मुख्याध्यापक पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली.