भाग्यनगर 10 वा क्राॅस मेन रोड येथे जलवाहिनीला मोठी गळती लागून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याची घटना आज बुधवारी पहाटे घडली. मात्र एका जागरूक नागरिकांमुळे संबंधित जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करण्यात आली.
आदर्शनगर, टिळकवाडीकडे जाणाऱ्या 10 वा क्रॉस भाग्यनगर मेनरोड येथील जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी आज पहाटे वाया जात होते.
या गळतीमुळे संपूर्ण मोठ्या प्रमाणात पाणी वाहत जाऊन संपूर्ण रस्त्यावर पाण्याचे तळे साचले होते. नेहमीप्रमाणे दररोज पहाटे फिरावयास जाणारे जागरूक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते दीपक अवर्सेकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.
सकाळी फिरायला जाताना स्वतःजवळ मोबाईल बाळगत नसल्यामुळे अवर्सेकर यांच्याकडे त्यावेळी फोन नव्हता. तेंव्हा त्यांनी पुन्हा माघारी घराकडे धाव घेऊन मोबाईल वरून महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिगिहळ्ळी यांना घटनेची माहिती दिली. तेव्हा अभियंता शिगिहळ्ळी यांनी तात्काळ जलवाहिनी दुरुस्तीची व्यवस्था केली. मात्र दरम्यान अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले होते. तसेच सकाळी 7:30 वाजेपर्यंत पाणी गळती पूर्णपणे थांबली नव्हती.
सदर रस्त्यावरून सकाळी बरेच जण ये -जा करत होते. परंतु पाणीगळती संदर्भात नेमकी कोठे तक्रार करावी याची माहिती नसल्यामुळे सर्वजण फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत होते.
तेंव्हा प्रशासनाने सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आणि सार्वजनिक ठिकाणी पाणी आणि विजेचा अपव्यय टाळण्यासाठी महत्वाच्या दूरध्वनी क्रमांकाचे फलक शहराच्या प्रत्येक प्रभागात ठिकाणी लावावेत, अशी मागणी दीपक अवर्सेकर यांच्यासह बहुसंख्य नागरिकांनी केली आहे.