बेळगावच्या प्रभाग पुनर्रचना व आरक्षणाच्या विरोधातील तक्रारी थेट महापालिकेत दाखल केल्या जात असून गेल्या बुधवारपर्यंत दोन दिवसात 5 जणांनी महापालिकेकडे लेखी आक्षेप दाखल केले आहेत.
शासनाने आता प्रभाग आरक्षण जाहीर करून केवळ त्यावरच आक्षेप मागविले आहेत. हे आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावे लागणार आहेत पण ते महापालिकेकडे दाखल केले जात आहेत.
माजी नगरसेवक विनायक गुंजकर यांनी काल गुरुवारी मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांच्याकडे लेखी आक्षेप दाखल केला. त्यात प्रभाग पुनर्रचना व आरक्षण हे चुकीच्या पद्धतीने झाल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांच्यासह माजी महापौर किरण सायनाक, माजी नगरसेवक राकेश पलंगे, मोहन भांदुर्गे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. आधीच्या पुनर्रचनेत मजगांवमधून प्रभाग सुरू होऊन कणबर्गीत संपत होते. यावेळी मात्र चुकीच्या पद्धतीने प्रभाग तयार केले आहेत. जुन्या प्रभागांची तोडफोड झाली असून नवीन प्रभाग शास्त्रीयदृष्ट्या योग्य नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. नव्या प्रभाग क्रमांक 1, 20 व 42 मध्ये अशी समस्या झाल्याचे आक्षेपात नमूद आहे.
महिलांसाठी प्रभाग आरक्षित करताना शहराच्या दोन्ही भागात ते समान ठेवणे आवश्यक होते. तथापि एका भागातच महिलांसाठीचे प्रभाग जास्त आहेत. 2006 मध्ये झालेल्या प्रभाग पुनर्रचनेनुसार महसूल व आरोग्य विभागाचे कामकाज चालते. याच प्रभागानुसार घरपट्टीचे चलन व अन्य प्रक्रिया होते. पण नव्या प्रभावामुळे कामकाजात अडथळा येईल हे माजी नगरसेवक विनायक गुंजकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
प्रभागांचे क्रमांक देखील चुकीचे असल्याचा आक्षेप नोंदविला आहे. तसेच नवीन प्रभाग रचना रद्द करून जुनी प्रभाग रचना कायम ठेवावी अशी मागणी केली आहे. गुंजेटकर, सायनाक, पलंगे व भांदुर्गे यांनी अनगोळ विभागातर्फे आक्षेप नोंदविले आहेत. यासंदर्भात ते जिल्हाधिकारी व प्रादेशिक आयुक्तांची देखील भेट घेणार आहेत.