राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात मला स्थान मिळेल की नाही माहित नाही. बेंगलोरहून अजून तरी मला बोलावणे आलेले नाही. दुसऱ्या कामासाठी मी बेंगलोरला जात आहे. मंत्री झालो तरी काम करणार आहे नाही झालो तरी आमदार म्हणून काम करतच राहीन, असे हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले.
बेळगाव येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना आमदार उमेश कत्ती यांनी मंत्रिपदाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मंत्रीपद मिळवण्यासाठी मी कधीही लॉबी तयार केलेली नाही, आता ही करणार नाही.
तथापि मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्या गाठीशी आहे. आमदार या नात्याने जिल्हा व तालुका पंचायतीच्या माध्यमातून 27 तलावांच्या संवर्धनाचे काम, रस्त्यांची कामे, मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आदी विकास कामे मी करून घेत आहे. मंत्रीपद नशिबात असेल तर ते मिळण्यापासून कोणीही मला रोखू शकणार नाही, असे आमदार कत्ती यांनी सांगितले.
पक्षाने मंत्री होण्याचा आदेश दिला तर मंत्री व्हावेच लागेल, पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करता येणार नाही. थोडक्यात मंत्रिमंडळ विस्तारात मला स्थान मिळेल की नाही याची मला सध्यातरी कल्पना नाही. नशिबात असेल तर मंत्री होईन अन्यथा आमदार म्हणून माझे काम करतच राहीन, असे आमदार उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले.