येत्या काळात बेळगाव महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा महापौर करून दाखवतो असे वक्तव्य राज्याचे नगर विकास मंत्री बी. ए. बसवराज यांनी केले आहे. बेळगाव महापालिकेची आगामी निवडणूक भाजप पक्ष चिन्हावर लढविणार असून त्यासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती देऊन एकंदर बेळगावचा आगामी महापौर भाजपचाच असेल असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे नगर विकास खात्याचे मंत्री बी. ए. बसवराज हे आज गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस बेळगाव दौऱ्यावर आले आहेत. नगर विकास मंत्र्यांनी आज दुपारी बेळगाव उत्तर भागातील अनेक विकासकामांचा पाहणी दौरा केला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी बेळगावचा आगामी महापौर भाजपचा असेल असे वक्तव्य केले.
स्मार्ट सिटीच्या विकासकामांची पाहणी केल्यानंतर बोलताना बेळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी खूप सहकार्य केले आहे असे सांगून आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार संक्रांतीनंतर होईल, असे ते म्हणाले. मात्र सर्व कांही मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर अवलंबून आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे येडियुरप्पा यांच्या मनात आहे आणि तो ते केंव्हाही करू शकतात, असेही ही मंत्री बसवराज यांनी स्पष्ट केले.
भाजपकडे गेलेले काँग्रेसकडे पुन्हा परत येतील या डी. के. शिवकुमार यांच्या वक्तव्यावर बोलताना नगर विकास मंत्री बसवराज म्हणाले की डी. के. शिव कुमार यांना तसे स्वप्न पडले असावे. भाजपमध्ये पक्षांतर करून आलेले पुन्हा काँग्रेसकडे जाणे शक्य नाही. त्याचप्रमाणे आगामी निवडणुका भाजप आपल्या पक्ष चिन्हावर लढविणार आहे, असेही त्यांनी सांगितले. बेळगाव महापालिकेत समोरील वादग्रस्त अनाधिकृत कन्नड ध्वजाबद्दल जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन योग्य तो निर्णय घेईल. या ध्वजा संदर्भात उद्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही नगर विकास मंत्री बसवराज यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री बदलतील असे म्हंटले होते. याबद्दल बोलताना राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पाच राहतील. त्यांना बदलण्याचा प्रश्नच येत नाही. सिद्धरामय्या ज्योतिषी बनले आहेत का? आता त्यांना दिवसाही स्वप्ने पडू लागली आहेत असे सांगून बी. एस येडियुरप्पा आपला मुख्यमंत्रीपदाचा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण करतील, असा विश्वास नगर विकास मंत्री बी. ए. बसवराज यांनी शेवटी व्यक्त केला.