Wednesday, December 4, 2024

/

स्मार्ट सिटीची कामे वेळेत पूर्ण करा- नगरविकास मंत्री

 belgaum

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बेळगाव शहरात हाती घेण्यात आलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, आणि जनतेच्या वापरासाठी त्वरित उपलब्ध करून द्यावीत, अशी कडक सूचना नगरविकास मंत्री बी. ए. बसवराज यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.

महानगर पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी स्मार्ट सिटी आणि नगरविकास प्राधिकरण विकास कामांसंदर्भात प्रगती आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था तातडीने करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. स्मार्ट सिटी केवळ कल्पना न राहता ती सिटी सत्यात उतरली पाहिजे. आणि स्मार्ट सिटीची कामे प्रत्येकाच्या नजरेत आली पाहिजे. यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामे पार पाडावीत, अशी सूचना त्यांनी दिली.

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या रस्ते विकासाच्या कामांची पूर्तताही लवकरात लवकर करून पादचाऱ्यांच्या सोयीसाठी उत्तम रस्त्याची व्यवस्था करण्याचेही त्यांनी सांगितले. सायकल ट्रॅक ची निर्मिती वैज्ञानिक पद्धतीने आणि योग्य रीतीने करण्यात यावी. सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ८० कोटींच्या अनुदानातून येणाऱ्या व्याजातून उपयुक्त कामे पार पाडण्यासाठी तातडीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. शिवाय या व्याजाच्या पैशातून बेळगाव शहर आणि दक्षिण मतदार संघातील विकासकामांवर भर देण्यात येईल, अशी माहिती मंत्री बसवराज यांनी दिली.

Mahapalika city corporation

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एकूण १०१ कामे हाती घेण्यात आली असून, ९३० कोटी रुपयांच्या खर्चातून ही कामे करण्यात येत आहेत, अशी माहिती स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक संचालक शशिधर कुरेर यांनी दिली. ४९४ कोटी रुपये अनुदान आतापर्यंत जाहीर करण्यात आले असून अद्याप ३६६ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. स्मार्ट सिटी अंतर्गत देशभर होत असलेल्या कामांमध्ये बेळगावचा क्रमांक सहावा असल्याचेही त्यांनी सांगितले.

२४ तास पाणी पुरवठा योजनेसदंर्भात बंगळूरमध्ये विशेष बैठक बोलाविण्यात यावी, आणि याविषयी चर्चा करण्यात यावी, असा सल्ला आमदार आणि केयूआयडीएफ सी अध्यक्ष शंकर पाटील यांनी दिला. बेळगाव स्मार्ट सिटीच्या धर्तीवर हुबळी – धारवाड येथेही कामे करण्यात यावीत, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.

या बैठकीला अनिल बेनके, केयूडब्ल्यूसी संचालक दीपा कुडची, बुडा अध्यक्ष घोळाप्पा होसमनी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पालिका आयुक्त जगदीश के. एच. बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.