बेळगाव शहरात नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांची शहानिशा करून संबंधितांना रितसर नोटीस देऊन अशा अवैध बांधकामांचे तात्काळ उच्चाटन करा अशी सूचना नगर विकास मंत्री बी. ए. बसवराज यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
बेळगाव महापालिकेच्या सभागृहामध्ये आज शुक्रवारी आयोजित बेळगांव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाच्या विकास आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन मंत्री बसवराज बोलत होते.
नगर विकास खात्याच्या सूचनांचे पालन काटेकोरपणे केले जावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत बोलताना बुडाच्या ज्या – ज्या ले-आऊट अर्थात जमिनी आहेत, त्यांना फेन्सिंग केले जावे आणि त्या ठिकाणी फलक उभारला जावा. या पद्धतीने कुंपण घातल्यामुळे बुडाच्या संपत्तीचे संरक्षण होईल, अशी सूचना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केली.
कणबर्गी येथील निवासी योजनेला तात्काळ परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती नगर विकास मंत्री बी. ए. बसवराज यांनी देऊन बुडाच्या विविध विकास कामाचा आढावा घेतला. बेळगाव महापालिका व्याप्तीमध्ये जी अनधिकृत बांधकामे आहेत, त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी मार्गदर्शक सूची तयार करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
केयुआयडीएफ अध्यक्ष शंकर पाटील, केयुडब्ल्यूसी संचालिका दीपा कुडची, बुडा अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, मनपा आयुक्त जगदीश के. एच. आणि बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.