राज्यात शालेय शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यानंतर शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. आता बेळगाव जिल्ह्यातही 22 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 22 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली. बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये एकूण 22 शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बेळगाव ग्रामीण भागातील 10, शहरातील 4, रामदुर्ग येथील 3 आणि कित्तूर येथील एका शिक्षकाचा कोरोनाबाधीत शिक्षकांमध्ये समावेश आहे. बेळगांव शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये या पद्धतीने 18 शिक्षक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये 4 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीत आढळून आले आहे. या चार शिक्षकांपैकी दोघेजण रायबाग तालुक्यातील असून अन्य दोघे हुक्केरी तालुक्यातील आहेत.
राज्यात 1 जानेवारी 2021पासून शाळा सुरू झाल्या असून दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसात राज्यातील 14 शिक्षकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे दोन शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात आता 22 शिक्षक कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासन याबाबतीत कोणती पावले उचलणार याकडे नागरिकांचे विशेषता पालकवर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.