कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दीची ठिकाणे आणि इतर गोष्टींवर आरोग्य मंत्रालयाने निर्बंध घातले होते. परंतु हळूहळू कोरोनाचा संसर्ग टळत असून लसीकरण सुद्धा हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपट गृह आणि स्विमिंग पूल संपूर्ण क्षमतेने वापरता येण्यासाठी केंद्राने परवानगी दिली आहे.
यासंदर्भातील कार्यप्रणाली लवकरच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी माहिती दिली आहे.
नव्या कार्यप्रणालीनुसार गृहमंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निरीक्षण, कंटेनमेंट झोन आणि सुरक्षेबाबत जाहीर करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्यासंदर्भातील निर्देश दिले आहेत.
हे निर्देश १ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत लागू असतील. यासोबतच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कंटेनमेंट झोनबाहेर सर्व व्यवहारांना परवानगी असेल. सामाजिक, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना त्या-त्या राज्यांच्या कार्यप्रणालीनुसार परवानगी दिली जाईल.