बेळगाव न्यायालयासमोरील डबल रोड अर्थात मुख्य दुपदरी हमरस्ता दिवसेंदिवस धोकादायक ठरत असून आजपासून न्यायालयं सुरू झाल्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. तेंव्हा या रस्त्यावर न्यायालयासमोर गतिरोधके बसविण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून आरटीओ सर्कलकडे जाणाऱ्या बेळगाव न्यायालयासमोर येईल डबल रोड अर्थात दुपदरी रस्त्यावर कायम मोठ्याप्रमाणात रहदारी असते. या रस्त्याच्या एका बाजूला जुने न्यायालय आहे तर दुसर्या बाजूला न्यायालयाची नवीन इमारत आहे.
त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या लोकांना आणि वकीलवर्गाला हा रस्ता ओलांडून सारखी याबाजूने त्याबाजूला पळापळ करावी लागत असते. मात्र रस्त्यावरील रहदारीमुळे त्यांच्या वेळेचा अपव्यय तर होतोच शिवाय अपघाताचाही धोका असतो.
सदर रस्त्यावरील सततच्या रहदारीमुळे आणि निष्काळजीपणे वाहने हाकणाऱ्या वाहन चालकांमुळे न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर यापूर्वी लहान -मोठे अपघात घडले आहेत. गेले आठ-दहा महिने न्यायालयीन कामकाज बंद असल्यामुळे चिंतेचे कारण नव्हते.
मात्र आजपासून न्यायालयं पूर्ववत सुरू झाली आहेत. त्यामुळे पक्षकार, वकील आदींची न्यायालय परिसरात पूर्वीप्रमाणे गर्दी होऊ लागली आहे. तेंव्हा सदर डबल रोडवर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला तात्काळ गतिरोधकं बसवावीत, अशी जोरदार मागणी ॲड. मारुती कामानाचे यांच्यासह समस्त वकीलवर्गाने केली आहे.