खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील फोटोग्राफर विजय चंद्रकांत अवलक्की (वय ५२, रा. रामपूर पेठ, जांबोटी) याचा खून झाला होता. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणात सामील असणाऱ्या संशयितांना अटक करण्यात आली आहे.
अनैतिक संबंनधला अडथळाला ठरत असल्याकारणाने त्याच्या पत्नीने प्रियकरासोबत हा कट रचला असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणातील शेवटची संशयित म्हणजेच मयत फोटोग्राफरची पत्नी सोबदा विजय अवलक्की (वय ४४) हिला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून तिची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे. याआधी रामचंद्र बाबुराव कांबळे (वय २१, राजवाडा, जांबोटी) आणि त्याचा मित्र नारायण ज्ञानेश्वर मेंढीलकर (वय 20, रा. कालमणी) या दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली होती. मयत फोटोग्राफरच्या पत्नीनेच खुनाची सुपारी तिचा प्रियकर रामचंद्रला दिली होती. यासाठी तिने १०००० रुपये दिले होते.
विजय अवलक्की याच्या दुकानात कामाला असणाऱ्या रामचंद्र कांबळे याने २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता विजय अवलक्की यांचा आपल्या मित्राच्या साहाय्याने निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले होते. दोन महिन्याचे वेतन न दिल्याच्या रागातून खून केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. पण या खून प्रकरणाला थकीत पगार हे कारण नसावे असा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता.
या खून प्रकरणाला अनैतिक संबंध कारणीभूत असल्याची चर्चा संपूर्ण गावभर सुरु होती. या माहितीवरून पोलिसांनी रामचंद्र कांबळे व अवलक्की यांची पत्नी हिचे मोबाईल संभाषण तपासले. यावरून या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे निदर्शनास आले. विजय अवलक्की यांना काही दिवसांपासून या प्रकरणाचा वास लागला होता. याच कारणावरून विजय अवलक्की यांनी रामचंद्र याला कामावरून काढून टाकले होते. पत्नीला दम देऊन सुधारण्याचाही सल्ला त्यांनी दिला होता. अनैतिक संबंधांना विजय अवलक्की यांचा विरोध सहन न झाल्याने त्यांच्या पत्नीने त्यांचा काटा काढला आहे, हे स्पष्ट झाले आहे.
विजय अवलक्की यांच्या खुनानंतर जांबोटी भागात संतापाचे वातावरण तयार झाले आहे. खुनानंतर पुरावे नष्ट करून मृतदेह जंगलात पुरल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. विजय अवलक्की यांचे अपहरण करून त्यांचा शिरच्छेद करून खून करण्यात आला आल्याचे उघडकीस आले असून या खूनप्रकरणी पत्नीसह सर्व संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
यातील ३ संशयित आरोपी अल्पवयीन असून त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रामचंद्र कांबळे आणि नारायण मेंडिलकर यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.