जागतिक शांतीचा संदेश देण्यासाठीच्या 17 वर्षीय सायकलपटू शुभम नारायण साखे याच्या बेळगाव ते गोवा आणि पुन्हा बेळगाव असा एकूण सुमारे 300 कि. मी. अंतराच्या धाडसी सायकलिंग उपक्रमाला आज सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. “सायकलिंग माझी आवड आणि जागतिक शांतता माझे ध्येय” हे शुभमच्या या उपक्रमाचे बोधवाक्य आहे.
गोवावेस येथील रोटरी -कॉर्पोरेशन स्विमिंगपूल येथे आज सकाळी 6 वाजता शुभम साखे याच्या सायकलिंग उपक्रमाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे बेळगाव रोलर स्केटिंग ॲकॅडमीचे अध्यक्ष उमेश कलघटगी यांनी ध्वज दाखवून उपक्रमाचा शुभारंभ केला.
याप्रसंगी विनोद बामणे, सूर्यकांत हिंडलगेकर, विनायक काटकर, बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी स्केटर्स साईराज मेंडके, देवेन बामणे, सत्यम पाटील, रवी सोनार, आरोही चित्रगार, आरुष चित्रगार, भरत पाटील, अथर्व भुते, ध्रुव पाटील आदींसह पालक, हितचिंतक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
गोवावेस, बेळगाव येथून सकाळी सायकलिंग करत निघालेला शुभम साखे आज दुपारी 4 वाजता तो गोव्याला पोहोचेल. बेळगावहून जांबोटी, बेटणे, कणकुंबी, चोर्ला चोर्ला घाट, गोंटिली, मुलगांव असनोरा, सरकेम, तिवीम मार्गे बागाबीच गोवा ( मुक्काम). गोव्याहून याच मार्गाने पुन्हा परत बेळगावात आगमन, असा शुभमच्या सायकलिंगचा मार्ग असणार आहे.
शुभम साखे हा भरतेश पॉलीटेक्निक कॉलेज कुडचीचा विद्यार्थी आहे. जगात चौफेर शांतता नांदावी अशी इच्छा बाळगणाऱ्या शुभमच्या या सायकलिंग उपक्रमाला इंडियन ऑइल लि. बेळगाव, विनू ग्राम सायकलिंग क्लब बेळगाव, शृंगेरी कॉलनी बेळगाव, जायन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव (परिवार) आणि भरतेश पॉलीटेक्निक एमएलबीपी यांनी पाठिंबा दर्शविला आहे.