आंबेवाडी (ता. बेळगाव) ग्रामपंचायतीच्या अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मण्णूर गावच्या हद्दीत तलावाचे खोलीकरणाचे काम करणाऱ्या कामगारांना जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
बेळगांव तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत मण्णूर गावच्या हद्दीत तलावाचे खोलीकरण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून होत आहे. या कामाचे परिक्षण करण्यासाठी जेष्ठ सर्वोदयी समाजसेवक शिवाजी कागणीकर यांनी आपले सहकारी राहुल पाटील, बसवंत कोले इत्यादी कार्यकर्त्यांसह नुकतीच तलावाच्या ठिकाणी भेट दिली. स्थानिक कार्यकर्ते सुधीर काकतकर व रोजगाराच्या कामावरील महिला कायक बंधूनी कामगारांच्यावतीने त्यांचे स्वागत केले.
यावेळी उपस्थित कामगारांना शिवाजी कागणीकर यांनी रोजगार हमी योजनेच्या कायद्याची माहिती दिली व दरवर्षीच्या 100 दिवसांबरोबरच यावर्षी कोरोना व नैसर्गिक आपत्तीच्या कारणाने मिळालेल्या अतिरीक्त 50 दिवसांच्या मजुरीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना राहुल पाटील यांनी कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्यांची व आगामी काळात महिलांसाठी घेण्यात येणाऱ्या आरोग्य शिबीरासंदर्भात उपस्थित कामगारांना समवेत चर्चा केली व कार्यालयीन समस्येबाबत संपर्क साधण्यास सांगितले.
अखेरीस बसवंत कोले व सुधिर काकतकर यांनी आपण जोमाने काम करू असे आश्वासन कामगारांच्यावतीने दिले. यावेळी मोठ्या संख्येने स्त्री -पुरुष कामगार उपस्थित होते.