बेेेळगाव शहराच्या हितासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीत भरवस्तीत असणारे बीफ मार्केट शहराबाहेर हलवावे या मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य पशु कल्याण मंडळाच्या सदस्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी राज्याचे नगर विकास मंत्री बी. ए. बसवराज यांना सादर केले आहे.
राज्याच्या नगर विकास खात्याचे मंत्री बी. ए. बसवराज दोन दिवसाच्या बेळगाव दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांची भेट घेऊन डॉ. सोनाली सरनोबत यांनी बेळगाव शहराच्या सुधारणेसह हिताच्या दृष्टिकोनातून विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले.
शहराच्या मध्यवर्ती भागातील कॅन्टोन्मेंट हद्दीतील बीफ मार्केट तेथील हिरव्यागार पर्यावरणास घातक ठरत असून भरवस्तीतील या मार्केटमुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. तेंव्हा सदर बीफ मार्केट लवकरात लवकर शहराबाहेर हलवावे.
शहरात अलीकडे मोकाट गाई, भटकी कुत्री आणि इतर मोकाट प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्यासाठी निवारा केंद्र उभारणे ही काळाची गरज बनली आहे. तेंव्हा बेंगलोर, म्हैसूर आदी जिल्ह्यांमध्ये हे सरकारी निधीतून ज्यापद्धतीने मोकाट प्राण्यांसाठी निवारा केंद्रं सुरुवात करण्यात आली आहेत, तशी सुविधा बेळगावसाठी उपलब्ध करून द्यावी.
त्याचप्रमाणे पशु संगोपन खात्याच्या उपसंचालकांना वारंवार विनंती करून देखील जिल्ह्यात प्राणी कौर्य प्रतिबंधक संस्थेची समिती अर्थात एसपीसीए कमिटी स्थापण्यात आलेली नाही. तेंव्हा ही कमिटी लवकरात लवकर स्थापण केली जावी.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करावी. प्राण्यांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी ऍम्ब्युलन्सची सोय केली जावी, अशा मागण्या डॉ. सरनोबत यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहेत. नगर विकास मंत्री बी. ए. बसवराज यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.