सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर कर्नाटकातील अनेक मंत्र्यांनी याविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली असून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगावच नाही तर मुंबईदेखील कर्नाटकाचा अविभाज्य घटक असल्याची दर्पोक्ती केली आहे.
चिकोडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर सवदींनी हे वक्तव्य केले आहे. एकेकाळी मुंबई हि सुद्धा कर्नाटकाचाच भाग होती. आणि बेळगावदेखील आता कर्नाटकाचाच अविभाज्य घटक असल्याचे भाष्य त्यांनी केले. आहे.
आज महाराष्ट्रात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर कर्नाटकात यासंदर्भात विविध नेत्यांनी उलट सुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. प्रकाशन सोहळ्यानंतर कर्नाटकातील नेत्यांचा तिळपापड झाला असून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी या पुस्तकाची प्रतिकात्मक होळी करण्याचा अश्लाघ्य प्रकारदेखील करण्यात आला आहे.
लक्ष्मण सवदी यांच्यासह बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनीही कुत्सित प्रतिक्रिया व्यक्त केली असून बेळगावच्या विषयावर महाराष्ट्रात चर्चा होत असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
हुतात्मा दिनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी सीमाभागासंदर्भात प्रतिक्रिया दिल्यानंतर कर्नाटकातील अनेक नेत्यांना याचा पोटशूळ उठला असून या नेत्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया देऊन आपली खदखद अशा पद्धतीने व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. परंतु कावळ्याच्या शापाने गाय कधीच मरत नाही! हि गोष्टही तितकीच कर्नाटकी नेत्यांनी लक्षात ठेवावी.