भाजपच्या उमेदवार घोषणेची वाट न पाहता निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर ताबडतोब काँग्रेसचा उमेदवार घोषित केला जाईल, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली. बेळगावमधील काँग्रेस भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
ते पुढे म्हणाले कि, सुरेश अंगडी यांच्या कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी देण्यात येईल कि, नाही ते आपल्याला माहित नाही. परंतु काँग्रेसचा उमेदवार कोणता असेल, यावर निर्णय घेण्यात आला असून काँग्रेसकडे आलेल्या उमेदवारी अर्जापैकी ३ उमेदवारांचा विचार करण्यात आला आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच उमेदवाराचे नाव देखील जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
भाजपच्या उमेदवार घोषणेबाबत काँग्रेसला कोणताही फरक पडत नाही. भाजप उमेदवार घोषित झाल्यानंतर काँग्रेसचा उमेदवार जाहीर होईल, असे काही नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी तारीख जाहीर करताच तिसऱ्या दिवशी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली.
माझ्या नावासहित अनेक मान्यवरांची नावे पुढे आली आहेत. परंतु या यादीत लक्ष्मी हेब्बाळकरांचे नाव नाही. प्रकाश हुक्केरी यांच्या नावाचीही चर्चा असल्याची विचारणा पत्रकारांनी केली, परंतु या प्रश्नाला जारकीहोळी यांनी उत्तर देणे टाळले.