भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हाप्रशासन, महानगरपालिका, जिल्हा पंचायत आणि इतर सरकारी कार्यालयाच्यावतीने आज ७२ व प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडांगणावर जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पथसंचलन, आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन कोविड संदर्भातील सर्व खबरदारी बाळगत मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण केले.
सर्वप्रथम सर्व देशवासियांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा देऊन नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नागरी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे त्यांनी अभिनंदन केले. बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक, नाट्यकर्मी डॉ. चंद्रशेखर कंबार यांना पदमभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. बेळगावमध्ये अनेक स्वातंत्र्यसेनानी आहेत, देशाच्या स्वातंत्र्यात बेळगावमधील सैनिकांचाही मोलाचा वाटा असून देशाच्या स्वातंत्र्यात बेळगावचेही योगदान असल्याचे जारकीहोळी यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, बेळगाव जिल्हा हा कर्नाटकातील मोठ्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात सर्व जाती-धर्माचे-भाषेचे लोक राहतात. अनेक वर्षे स्नेह आणि आपुलकी बाळगून राहणारे बेळगाववासीय यापुढील काळातही घटनेने दिलेल्या अधिकाराचा आदर राखतात आणि यापुढेही हा स्नेह असाच वृद्धिंगत ठेवावा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या अनेक योजना आखण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्तांना नुकसानभरपाई, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई यासोबतच शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कोविड संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने पाऊले पुढे टाकण्यासाठी बेळगावमध्ये लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून जिल्ह्यात १३ केंद्रावर सरकारी मार्गसूचीनुसार लसीकरण करण्यात येत आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीक नुकसान भरपाईसाठी ९८ हजार २७८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७४ कोटी ७१ लाख रुपये जमा करण्यात आले असून पूरग्रस्तांसाठी ६ हजार ९७ लाभार्थ्यांची माहिती जमा करण्यात आली आहे. राजीव गांधी गृहनिर्माण सॉफ्टवेअरमध्ये हि माहिती समाविष्ट करण्यात आली असून नुकसानग्रस्त घरांसाठी जिल्ह्यात ३१ कोटी २९ लाख रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पूरपरिस्थितीत उद्भवलेल्या मूलभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी २० कोटी २६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील पावसाळी परिस्थिती, शेतकऱ्यांना पुरविण्यात येणारे बियाणे, दुष्काळ परिस्थिती, शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या -समस्यांवरील उपाययोजना, सरकारी योजना, आरोग्यविषयक सुविधा, आरोग्य केंद्राच्या इमारती उभारणे, सर्वोत्तम आरोग्यसेवा पुरविणे, बीपीएल कारधारकांसाठी विनामूल्य गॅस पुरवठा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, महिला व बालकल्याण विकास योजना, शैक्षणिक सेवा-सुविधा, रोजगार योजना, झोपडपट्ट्या विकास आणि इतर महत्वाच्या विषयांचा रमेश जारकीहोळी यांनी आढावा घेतला. आणि सर्व क्षेत्रात विकास करून उत्तम सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त के. त्यागराजां यांच्यासह अनेक अधिकारी, राजकीय नेते आणि मान्यवर उपस्थित होते.