केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय पटलावर बऱ्याच घडामोडी घडत आहेत. अंगडी जर असत असते तर ते मुख्यमंत्री झाले असतेअशीही चर्चा सुरू आहे.आगामी काळात ते मुख्यमंत्री होणार होते याला भाजप मधील अनेकांनी दुजोरा दिलाय.
सुरेश अंगडी यांच्या मनात मराठी भाषिक जनतविषयी विशेष जिव्हाळा आणि आपुलकी होती.मराठी भाषिकांशी ते मराठीत बोलत असत.त्यामुळे मराठी जनतेत देखील त्यांच्या विषयी आत्मीयता होती.मराठी भाषिकांच्या कार्यक्रमात ते मराठीतून भाषण करत होते.त्यामुळे मराठी भाषिकांना ते आपलेसे वाटत होते.
महानगर पालिकेवर असलेला भगवा ध्वज स्थलांतर झाल्यावर लावला गेला नाही.त्यावेळी त्यांनी मोर्चा काढून भगवा ध्वज लावण्याची मागणी केली होती.आज याचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे मनपा समोर लावण्यात आलेला कन्नड ध्वज.
सुरेश अंगडी यांचा नेहमी असा प्रयत्न असायचा की समाजात कोणत्याही गोष्टीमुळे तेढ निर्माण होवू नये.यासाठी अनेक वेळा त्यांनी पक्षातील तसेच अन्य संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना देखील वेळोवेळी सुनावले होते.त्यामुळे असेही म्हंटले जात आहे की अंगडी जर हयात असते तर कन्नड ध्वज लावायाला त्यांनी परवानगी दिलीच नसती.मनपा वर भगवा ध्वज लावा म्हणून त्यांनी कन्नड संघटनांचा रोष ओढवून घेतला होता पण त्याची पर्वा त्यांनी कधीच केली नव्हती अशीही चर्चा आहे
रेल्वेमंत्री पदभार स्वीकारल्यावर तर त्यांनी कामाचा धडाकाच सुरू केला होता.चार वेळा निवडून आल्यामुळे दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता.कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चा बऱ्याच महिन्यांपासून सुरू आहेत.सुरेश अंगडी हे उत्तर कर्नाटकातील एक लिंगायत समाजाचे वजनदार नेते होते.त्यांचे चारित्र्य निष्कलंक होते.अन्य नेत्या प्रमाणे त्यांच्यावर विरोधकांनी देखील कधी आरोप केल्याचे ऐकिवात नाही.त्यामुळे डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या प्रारंभी अंगडी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याचं निश्चित होते.पण कोरोना मुळे सगळेच बिघडले.
अंगडी जर मुख्यमंत्री झाले असते तर मराठी भाषिकांच्या वर होणारा अन्याय त्यांनी निश्चितच दूर केला असता.मराठी भाषिकांच्या समस्या ,अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे.त्यांच्या निधनामुळे हक्काने दाद मागावी असा राजकारणी मराठी भाषिकांना राहिला नाही हेच खरे.