सध्या सीमाभागात लाल – पिवळ्या ध्वजावरून रणकंदन माजले आहे. महानगरपालिकेसमोर कन्नड रक्षण वेदिकेच्या आततायी कार्यकर्त्यांनी लाल – पिवळा ध्वज फडकविला आणि मराठी माणूस दुखावला गेला. पूर्वी महानगरपालिकेच्या सभागृहात ठराव मांडण्यात येऊन महानगरपालिकेवर कायमस्वरूपी भगवा ध्व्ज फडकविण्यासाठी तो ठराव पास करण्यात आला. याच ठरावाला बगल देत भगवा ध्वज हटविण्यात आला. हे मराठी मनाचे दुःख अधिक तीव्र या प्रसंगामुळे झाले.
आज प्रत्येक मराठी माणूस मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आला पाहिजे, आणि तो येणारच अशी भावना सर्व मराठी माणसांच्या मनात द्विगुणीत होत चालली आहे. कारण मराठी माणसाचे मन दुखावण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांकडून होत आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा हे बेळगाव भेटीसाठी आले. बेळगावमधील मराठी भाषिक जनतेच्या व्यथा मांडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांच्या भेटीची मागणी केली. त्यांचा थोडासा वेळ मिळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले. परंतु भारतीय जनता पक्षाचे बिंग फुटेल या भीतीने भाजपने ही भेट जाणीवपूर्वक टाळली.
महाराष्ट्र एकीकरण समितीला वेळ देण्याचे टाळण्यात आले. हा मराठी माणसांचा अपमान आहे. बेळगावमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक जनता असून मराठी बहुल भागातच गृहमंत्री येऊनही भेट नाकारणे हे लोकशाहीला तिलांजली देण्यासारखे आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी, विरोधी पक्षातील जे जे मराठी नेते आहेत, त्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या नेत्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे.
आपल्या एकंदर हक्कासाठी आपण एकजूट होऊन लढले पाहिजे. एकाचे दहा होऊन संघटित होऊनच मराठी माणसाला न्याय मिळू शकेल, आणि एकजूटीनेच मराठी माणसाला फायदा होईल, ही बाब मराठी माणसाच्या मनात बिंबविणे गरजेचे आहे.