रेशन दुकानातून आता लवकरच तांदूळ आणि गव्हाबरोबरच साबण, पामतेल आणि मिठाचे वितरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना देखील हे साहित्य सहज उपलब्ध व्हावे यादृष्टीने अन्न व नागरी पुरवठा खात्याने हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील रेशन दुकानदारांचे कमिशन वाढावावे अशी मागणी 2003 पासून होते. परंतु आत्तापर्यंत सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. आता रेशन दुकानदारांना ई -केवायसी काम सुरू करण्याची सूचना करण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नसताना ई -केवायसी सुरू करणे हे किती सुरक्षित आहे? असा प्रश्न रेशन दुकानदारांकडून केला जात आहे. सध्या जिल्ह्यात ई -केवायसीचे सुमारे 75 टक्के काम पूर्ण झाले असून सध्या कोरोनामुळे हे काम स्थगित आहे.
दरम्यान, रेशन दुकानांमधून साबणाचे वितरण करण्याबाबत अद्याप आदेश आलेला नाही. रेशन दुकानदारांचे कमिशन व अन्य समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बेळगाव जिल्हा अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक चन्नबसप्पा कोडली यांनी दिली आहे.