बेळगाव महानगरपालिका आवारातील राष्ट्रध्वज समोर अनधिकृतरित्या फडकविण्यात आलेल्या लाल-पिवळ्या ध्वजासंदर्भात कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतला जाईल असे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज स्पष्ट केले.
बेळगाव महापालिका आवारातील राष्ट्रध्वजासमोर अनाधिकृत लाल -पिवळा ध्वज फडकविण्यात आला आहे. याच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जोरदार आवाज उठवला आहे. प्रशासनाने संबंधित ध्वज त्वरित हटवावा, अन्यथा छाताडावर चढून महापालिकेवर भगवा फडकवण्याचा इशाराही युवा समितीने दिला आहे.
यासंदर्भात शहरात आज शनिवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्र्यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले. ग्रामपंचायत निवडणुका आणि नववर्षाचे स्वागत यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे आवश्यक होते.
मात्र आता संबंधित ध्वजाबाबत जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांशी चर्चा करून लवकरात लवकर कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतला जाईल. त्याप्रमाणे पोलीस आयुक्तांना निर्णयाची अंमलबजावणी करताना कायदा आणि सुव्यवस्थेला कोणताही धक्का लागणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले जाईल, असे पालकमंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी देखील कर्नाटकात कन्नड ध्वज का लावू नये? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत आपले मत काय असे पत्रकारांनी विचारले असता जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी तुम्ही त्याला जास्त महत्व देऊ नका असे पत्रकारांना सुनावले.