बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि चिकोडीचे माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी एका अपघातग्रस्त इसमाला मदत करून माणुसकीचे दर्शन घडविल्याची घटना आज सकाळी घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की जिल्ह्यातील काँग्रेस नेते प्रकाश हुक्केरी हे आज सकाळी आपल्या कारगाडीतून बेळगावहून बेंगलोरकडे निघाले होते. त्यावेळी हिरेबागेवाडीनजीक झालेल्या अपघातात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तेंव्हा हुक्केरी यांनी आपली गाडी थांबून अपघातस्थळी धाव घेतली असता एक इसम अपघातात जखमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेंव्हा लागलीच त्यांनी स्वतः जातीने मदत कार्य हाती घेताना फोन करून तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि जखमी इसमाला रुग्णवाहिकेत घालून त्याची रवानगी इस्पितळातकडे केली.
जिल्ह्यातील मोठे राजकीय नेते असतानादेखील आपले पद विसरून सर्वसामान्याच्या मदतीला धावून आलेल्या प्रकाश हुक्केरी यांच्यातील या माणुसकीच्या दर्शनामुळे उपस्थितांमध्ये आदरभाव व्यक्त होताना दिसत होता.