येत्या एक-दोन दिवसात कोरोना प्रतिबंधक लस बेळगावात दाखल झाल्यानंतर लागलीच कोरोना लसीकरण सुरू होणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जानेवारीत होणारी पोलिओ लसीकरण मोहिम रद्द करून लांबणीवर टाकली आहे.
दरवर्षी जानेवारी महिन्यात पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाते. बेळगाव जिल्ह्यात 17 जानेवारीपासून नवजात शिशुंसह 5 वर्षे वयाखालील मुलांना पोलिओ लस दिली जाणार होती. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यासंदर्भात आरोग्य खात्याची बैठक घेऊन पोलिओ लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला होता.
त्यानुसार येत्या 17 ते 20 जानेवारीपर्यंत चार दिवस प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासह मोक्याच्या ठिकाणी आणि लहान मुलांना पोलिओ लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वी कोरोना प्रतिबंधक लस खाल्ल्यास त्यासाठी सज्ज राहण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती.
आता कोरोनाची लस येण्याचे निश्चित झाल्यामुळे पोलिओ लसीकरण मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. कारण पोलिओ लसीकरण मोहिमेतील मनुष्यबळाचा वापर कोरोना लसीकरणासाठी केला जाणार आहे.
त्यामुळे आता कोरोना लसीकरणानंतरच पोलिओकडे लक्ष दिले जाणार आहे. एकंदर दरवर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेला यंदा खंड पडणार आहे.