बेळगाव महापालिकेसमोर उभारण्यात आलेला अनधिकृत लाल -पिवळा ध्वज हटवावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि समस्त मराठी भाषिकांतर्फे काढण्यात येणार्या महामोर्चाची धास्ती जिल्हा प्रशासन व पोलिसांनी घेतली आहे.
सदर मोर्चा तूर्तास स्थगित झाला असला तरी लाल-पिवळ्याला संरक्षण देण्यासाठी महापालिका कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कांही कन्नड संघटनांच्या मूठभर उपद्रवी कार्यकर्त्यांनी गेल्या 28 डिसेंबर रोजी बेळगाव महापालिकेसमोर लाल -पिवळ्या रंगाचा ध्वज अनधिकृतरित्या उभारला आहे. त्याचप्रमाणे हा ध्वज उभारून त्यांनी महापालिकेसमोरील राष्ट्रध्वजाचाही अपमान केला आहे. याच्या निषेधार्थ आणि लाल -पिवळा ध्वज हटवावा या मागणीसाठी म. ए. समितीसह समस्त मराठी भाषिकांनी आज गुरुवारी महामोर्चाचे आयोजन केले होते.
पोलिस प्रशासनाच्या विनंतीवरून हा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आला आहे. तथापि समस्त मराठी भाषिकांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि महामोर्चाचा निर्धार यामुळे जिल्हा प्रशासन व पोलिस खाते धास्तावले आहे. परिणामी पोलिस प्रशासनाकडून महापालिका परिसरात आज मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिकेकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आले आहेत.
परिसरातील प्रत्येक रस्त्यावर पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. महापालिकेसमोर उभारण्यात आलेल्या अनाधिकृत लाल-पिवळ्या ध्वजाला संरक्षण देण्यासाठी संपूर्ण परिसरात जणू पोलीस छावणीच उभारण्यात आली आहे. बॅरिकेड्स टाकून रस्ते रोखण्यात आल्यामुळे महापालिका परिसरात पोलीस वगळता वातावरण निर्मनुष्य दिसत होते. सर्वत्र तणावपूर्ण शांतता जाणवत आहे. पोलिसांनी आज भल्या सकाळपासून अचानक रस्ते बंद केल्यामुळे या भागातील रहिवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली.
दरम्यान, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी काल बुधवारी उशिरा मार्केट पोलिस स्थानकामध्ये मध्यवर्ती समितीच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन मोर्चा काढू नका अशी विनंती केली. या प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी लवकरच निर्णय घेतील. त्यानंतर तुम्हाला आम्ही मोर्चा काढण्यास परवानगी देऊ असेही पोलीस उपायुक्त डॉ. आमटे यांनी त्यावेळी सांगितले आहे. लाल-पिवळ्या ध्वजाच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन चर्चा करून निर्णय देणार असल्याचेही सांगण्यात आले.