बेळगाव शहर आणि परिसरात रस्त्याची जागा खड्ड्यांनी व्यापली आहे. कधी रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे पडलेले खड्डे तर कधी रस्तेविकासाच्या नावावर खोदण्यात आलेले खड्डे! शहर परिसरात या ना त्या कारणाने पडलेल्या खड्ड्यांमुळे आता जनतेला रस्त्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
असे प्रकार वरचेवर निदर्शनास येत असून क्लब रोडवर एका नव्या पद्धतीच्या खड्ड्याची भर पडली आहे. ज्योती कॉलेज गेट समोर दुभाजकाला लागून गटारीसाठी करण्यात आलेले खोदकाम उघड्यावर सोडण्यात आले आहे.
दुभाजकाला लागूनच भले मोठे भगदाड उघड्यावर ठेवण्यात आले असून या भगदाडाच्या चारी बाजूंनी लोखंडी गजदेखील असेच उघडे आहेत. शिवाय या खड्ड्याच्या आजूबाजूला कोणतीही सावधानतेचा सूचनाही देण्यात आलेली नाही. रस्तेविकास करणारे कंत्राटदार बहुधा या खड्ड्यात कुणाचा तरी जीव जाण्याचा वाट पाहत आहे.
या खड्ड्याचा फोटो खुद्द मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला असल्याची बातमी आहे. शहरात खड्डे आणि विकासाच्या नावावर करण्यात येत असलेले रस्त्याचे कामकाज यात अनेकांचे नुकसान झालेच आहे.
आता क्लब रोडवरील या खड्ड्याचा मुहूर्त जनतेच्या कपाळी लागणार कि विकासकाम करणाऱ्या कंत्राटदारांच्या हाती लागणार? हे येणारी वेळच सांगू शकेल.