आगामी काळात महानगरपालिका निवडणूक होऊ घातल्या आहेत. यासंदर्भात वॉर्डनिहाय पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्यासंबंधी न्यायालयाने आदेश बजावले होते. त्यानुसार नुकतेच महानगरपालिका वॉर्ड पुनर्रचना जाहीर करण्यात आले असून वॉर्डची पुनर्र्चना हि चुकीच्या पद्धतीने केली असून यात त्वरित बदल करण्यात यावा, यासाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर आणि इतर माजी नगरसेवकांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात वॉर्ड पुनर्रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी नमूद केल्या आहेत. मागीलवेळी मजगाव ते कणबर्गी पर्यंत ५८ वॉर्ड स्थापन करण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांच्या, नगरसेवकांच्या आणि प्रामुख्याने भौगोलिकदृष्ट्या सोयीचे ठरतील अशा पद्धतीने वॉर्ड स्थापन करण्यात आले होते.
परंतु आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वॉर्डची रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून हि अवैज्ञानिक आहे. यामुळे सरकारी कार्यालयातील नोंदी, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि इतर सरकारी कागदपत्रांवरील तपशिलात गोंधळ निर्माण होऊ शकतो. सध्या जाहीर झालेले वॉर्ड हे विभाजन करून पुन्हा यात दोन ते तीन वॉर्ड मिळून एक वॉर्ड करण्यात आला आहे. या वॉर्ड रचनेत कोणतेही तारतम्य बाळगण्यात आले नसून यामुळे एका वॉर्डच्या नगरसेवकाला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लक्ष द्यावे लागणार आहे.
हि वॉर्डरचना सलग पद्धतीने करण्यात आलेली नसून, विस्कटलेल्या पद्धतीने करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वॉर्ड क्रमांक १ मध्ये शनिवार खुटपासून पीबी रोड, गणपत गल्ली, घी गल्ली, जालगार गल्ली आणि कोतवाल गल्ली अशा भागांचा समावेश आहे. त्यानंतर वॉर्ड क्रमांक २० मध्ये एनएच ४ येथील पाटील सॉ मिलपासून कनकदास सर्कल, कणबर्गी रोड, संकम हॉटेल, न्यू गांधी नगर ते खासबाग, आझाद नगर आणि टंक बुंद रोड असा समावेश आहे.
अशाच पद्धतीने वॉर्ड क्रमांक ४२ ची रचनाही करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त वॉर्डनिहाय आरक्षण देखील सलग महिलांनाच देण्यात आले असून यामुळे वॉर्डनिहाय लक्ष पुरविणे अडचणीचे ठरणार आहे. याव्यतिरिक्त एक प्रभाग महिला आणि दुसरा पुरुष असे आरक्षण देण्यात आल्यास सोयीचे ठरेल. वॉर्ड क्रमांक ४ आणि ५ हे दोन्ही वॉर्ड नंतर ३१ आणि ३२ मध्ये वर्ग करण्यात आले परंतु अद्यापही वॉर्ड क्रमांक ४ आणि ५ प्रमाणेच सर्व नागरिक मालमत्ता कर आणि इतर कर भरतात. मग पुनर्र्चना करण्याची गरज काय? आणि अशी पुनर्र्चना कोणत्या फायद्याची ठरली? यामुळे नगरसेवक आणि नागरिकांना गैरसोय होणार असून हि रचना पुन्हा एकदा फेरबदल करून जाहीर करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन सादर करताना विनायक गुंजटकर, राजू पवार, अमित हलगेकर, मोहन भांदुर्गे, राकेश पलंगे, बसवंत येतोजी आदींसह इतर माजी नगरसेवक उपस्थित होते.