महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या अध्यक्षपदी शुभम शेळके यांची फेरनिवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने ‘बेळगाव लाईव्ह’ने त्यांच्याशी केलेली खास बातचीत..
मागील 2 वर्षांपासून सीमाभागात मध्यवर्ती, शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत गटा-तटाच्या राजकारणाला ऊत आला असून मराठी जनतेच्या बाजूने आवाज उठविण्यासाठी खंबीर नेतृत्वच उरले नाही. यादरम्यान सीमाभागात गेली 2 वर्षे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मराठी भाषिकांच्या लढ्याला पाठबळ मिळाले. मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी कायदेशीररित्या लढा उभारला जाऊ लागला. कागदपत्रांची मराठीतून पूर्तता, मातृभाषेतून शिक्षण, पाठयपुस्तकांसाठी सततचा पाठपुरावा, प्रशासनाची दडपशाही, मराठी भाषिकांवर लादण्यात येणारी कन्नडसक्ती, नाहक अन्याय, मराठी युवकांवर दाखल होत असलेले खोटे गुन्हे या साऱ्यांवर खंबीरपणे मराठी जनतेच्या पाठीशी उभं रहात युवा समितीच्या माध्यमातून शुभम शेळके यांनी लढा उभारला आहे. गेल्या २ वर्षात युवा समितीच्या माध्यमातून भरीव कामगिरी करण्यात आली आहे.
‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना शुभम शेळके म्हणाले, कि समितीमधील गट – तट बाजूला सारून सर्व समिती नेत्यांना एकत्रित करून शिवाय राष्ट्रीय पक्षांच्या मार्गाला गेलेल्या मराठी जनतेला आणि युवा वर्गाला पुन्हा समितीच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांमध्ये जनजागृती, मराठी शाळा टिकवण्यासाठी आंदोलन, मातृभाषेतील शिक्षण सुधारण्यासाठी कोणते शैक्षणिक उपक्रम राबवावेत यासाठी आगळे आंदोलन, विविध शैक्षणिक उपक्रम, मराठी कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांसाठी पाठयपुस्तक आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम यासह सीमाभागातील मराठी भाषा टिकविण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. याव्यतिरिक्त राष्ट्रीय पक्षांनी समितीबाबत पसरविले गैरसमज दूर सारून युवा वर्गासह प्रत्येक मराठी भाषिक जनतेला समितीच्या प्रवाहात आणण्यासाठी युवा समिती प्रयत्नशील असल्याचे शुभम शेळके म्हणाले. समितीमधील गटबाजीविषयी बोलताना शेळके म्हणाले, कि समितीमधील प्रत्येक नेत्याचे चेहेरे हे वेगवेगळ्या दिशांना आहेत. समिती नेत्यांचे अहंकार यासाठी कारणीभूत असून यामुळे सीमाभागातील जनतेला नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ समिती नेत्यांसह सीमाभागातील युवकांनीही या लढ्याची जबाबदारी स्वतःहून आपल्या खांद्यावर घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
येत्या १७ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी युवा समितीच्या वतीने त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला जाणार असून काश्मीरच्या धर्तीवर अमीत शहा यांना प्रश्न विचारण्यात येणार आहे. ‘वन नेशन वन फ्लॅग’ या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेला कायदा हा कर्नाटकात आणि विशेषतः बेळगावमध्ये लागू होत नाही का? बेळगाव हे भारतीय लोकशाहीला अनुसरून नाही का? आणि बेळगाव सह कर्नाटक हे भारताबाहेर आहे का? नसेल तर कर्नाटकात भारतीय संविधान लागू होत नाही का? असे प्रश्न अमित शहांना विचारण्यात येणार आहेत.
सीमाभागात मध्यवर्ती, शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीपेक्षाही युवा समितीचे कार्य उत्तम आहे. सीमाभागात युवा समितीने आक्रमकरित्या काम केले असून मराठी जनतेचा विश्वासही संपादित केला आहे. युवा समितीच्या माध्यमातून शुभम शेळके यांच्यासारखे नेतृत्व मराठी जनतेला मिळाले असून सध्या मराठी भाषिक जनता शुभम शेळके यांच्यावर विश्वास ठेऊन आहे.
समितीमधील गटा-तटाच्या राजकारणामुळे मराठी जनतेचा समिती नेत्यांवरील विश्वास पूर्णपणे नष्ट झाल्याचे चित्र आहे. अशावेळी शुभम शेळके यांनी समितीमध्ये पुन्हा एकदा नवचेतना निर्माण करण्याचा विडा उचलला आहे. युवा समिती अध्यक्षपदी शुभम शेळके यांची फेरनिवड झाल्यामुळे आगामी काळात मराठी जनतेला तरुण नेत्याच्या स्वरूपात सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे दिसून येत आहे.