हुन्नरगी येथील मानव बंधुत्व वेदिके या संघटनेचे कार्यकर्ते व कल्लोळ (ता. चिक्कोडी) येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रकाश बरगाले व नूतन ग्रा. पं सदस्य भारती प्रकाश बरगाले या दांपत्याने आपल्या बाळाचे बारसे चक्क स्मशानभूमीत घालून अंधश्रद्धेला मूठमाती दिली.
हा आगळावेगळा उपक्रम रविवारी सकाळी केपीसीसी कार्याध्यक्ष व मानव बंधुत्व वेदिकेचे संस्थापक आमदार सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले की, छ. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, संत बसवेश्वर आदी महान व्यक्तींनी समाजातील अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. त्यांचा हा लढा पुढे चालविण्याचे काम मानव बंधुत्व वेदिकेच्या माध्यमातून सुरू आहे.
मंदिर काय किंवा स्मशानभूमी काय ही दोन्ही पवित्र स्थाने आहेत. परंतु लोक विनाकारण घाबरून अफवा पसरवतात. हुन्नरगी सारख्या छोट्या गावातील स्मशानभूमीत झालेला हा बाळाचा नामकरण सोहळा म्हणजे एक ऐतिहासिक क्षण आहे असे सांगून या उपक्रमाद्वारे बरगाले दाम्पत्याने एक नवा आदर्श निर्माण केला आहे, असे आमदार जारकीहोळी म्हणाले.
सदर बारशाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून हुन्नरगी येथील नूतन ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमास माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी खासदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, आमदार गणेश हुक्केरी, केपीसीसी सचिव सुनील हणमनण्णावर, विलास गाडीवड्डर, जि. पं. सदस्य राजेंद्र वडर, युवा नेते उत्तम पाटील, निपाणी ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष राजेश कदम, अशोककुमार असोदे, ता. पं. सदस्या सुजाता मगदूम, प्रदीप जाधव आदींसह मानव बंधुत्व वेदिकेचे बहुसंख्य सदस्य आणि निमंत्रित उपस्थित होते. चंद्रशेखर हिरेमठ यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले तर राहुल गुरव यांनी सर्वांचे आभार मानले.