तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवार दि. ९ जानेवारी रोजी पार पडली. या बैठकीत हुतात्मा दिन, मनपा समोर फडकविण्यात आलेला लाल-पिवळा आणि इतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. 21 रोजी विराट मोर्चा काढून मनपा समोरील लाल पिवळा ध्वज हटवणार असा निर्धार तालुका समिती बैठकीत करण्यात आला.
१७ जानेवारी रोजी होणारा हुतात्मादिन गांभीर्याने पाळावा, यासंदर्भात उपस्थित मान्यवरांनी सूचना केल्या. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि समस्त मराठी भाषिकांच्यावतीने या हुतात्मादिनी कंग्राळी खुर्द येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता हा श्रद्धांजली कार्यक्रम होणार असून त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी महानगरपालिकेसमोर उभारण्यात आलेल्या लाल-पिवळ्याबाबतही चर्चा झाली. महानगरपालिकेसमोर उभारण्यात आलेला लाल – पिवळा हा अनधिकृत असून कन्नड संघटनांनी बेकायदेशीररीत्या हा ध्वज उभारला आहे. याचा निषेध या बैठकीत नोंदविण्यात आला असून हा ध्वज त्वरित हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना म. ए. समिती आणि शिवसेनेने निवेदन दिले आहे.
हा ध्वज त्वरित हटविण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांशी चर्चा करण्यात आली असून येत्या २१ जानेवारीपर्यंतचा वेळ जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेअंती दिला आहे. येत्या २१ तारखेनंतर हा ध्वज हटविण्यात आला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाने निषेध नोंदविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त इतर अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीला माजी आमदार मनोहर किणेकर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, संतोष महाडिक, एल. आय. पाटील यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.