येत्या ४ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान बेळगावमधील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यालयाच्या मैदानावर सैन्य भरती मेळावा भरणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
बुधवार दि. ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी हि माहिती दिली असून या सैन्य भरती दरम्यान येणाऱ्या उमेदवारांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
सैन्य भरती प्रधान कार्यालय परिसरात बेळगावसह रायचूर, यादगिरी, बिदर, कोप्पळ आणि कलबुर्गी या जिल्ह्यातील अनेक उमेदवार हजर होतात. सैन्य भरतीच्या विविध विभागात दाखल होण्यासाठी वय, शैक्षणिक पात्रता आणि इतर निकषाचा तपशील सैन्य भरती कार्यालयातर्फे दि ४ डिसेंबर २०२० रोजी भारतीय सेनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अधिसूचना देण्यात आली होती. वरील नमूद केलेल्या जिल्ह्यातील जिल्ह्यातील एकूण ४०००० उमेदवारांनी ऑनलाईन नावनोंदणी केली आहे.
www.joinindianarmy.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नावनोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात येईल. आगामी सैन्य भरती यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग सहकार्य करेल, अशी ग्वाही सैन्य भरती अधिकाऱ्यांना देण्यात आली.
या बैठकीला सैन्य भरती संचालक राहुल आर्य, डीसीपी विक्रम आमटे, विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए. जी. बुजारकी, डी. एस. पी. करुणाकर शेट्टी, एसीपी गणपती गुडची, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अधिकारी शशिकांत मुन्याळ, जिल्हा क्रीडा अधिकारी व्ही. एस. पाटील, बीएसएनएलचे अधिकारी एन. टी. बाळेकुंद्री आदींसह इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.