बुधवार दिनांक १३ जानेवारी रोजी भोगी आणि गुरुवार दिनांक १४ जानेवारी रोजी होणाऱ्या संक्रांती सणासाठी बाजारपेठेत पांढरे शुभ्र तिळगुळ, काळे तीळ, वाणाच्या वस्तू यासह या सणासाठी लागणारे सर्व साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले असून चार ते पाच दिवसांवर आलेल्या या सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे.
बाजारपेठेत तिळाचे लाडू, तिळगुळाचे दागिने, तसेच मकर संक्रांतीपासून सुरु होणाऱ्या हळदी-कुंकू समारंभासाठी विशेष आणि नाविन्यपूर्ण भेटवस्तूही विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
कोरोनाकाळापासून ऑनलाईन मार्केटिंगलाही अधिक वाव मिळत असून अनेक महिलावर्ग वाणाच्या विविध संकल्पना सोशल साईटच्या माध्यमातून विक्री करत आहेत. बाजारपेठेत आरसा, प्लास्टिकचे साहित्य, सुवासिनीच्या शृंगाराचे साहित्य यासह नाविन्यपूर्ण साज असलेल्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.
नरगुंदकर भावे चौकासह, गणपत गल्ली, कांदा मार्केट तसेच होलसेल मार्केटमध्ये नवविवाहितेचे तिळगुळाचे नवनवीन दागिने उपलब्ध झाले असून या दागिन्यांनी बाजारपेठ आकर्षकरित्या सजली आहे. तिळगुळाचा हार, कर्णफुले, किरीट, बाजूबंद, कमरपट्टा, नथ, मंगळसूत्र, काकण यासह अनेक दागिने उपलब्ध झाले आहेत. याचप्रमाणे चिमुकल्यांच्या बोरनहाण कार्यक्रमासाठीही हलव्याचे पारंपरिक दागिने उपलब्ध झाले आहेत.
साधारण ८० रुपये प्रतिकिलो साधे तिळगुळ, २०० रुपये प्रतिकिलो काटेरी तिळगुळ, रेवडी २५० रुपये प्रतिकिलो, शेंगा तिळगुळ २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो, काजू – बदाम तिळगुळ ५०० रुपये प्रतिकिलो, बडीशेप तिळगुळ २५० रुपये प्रतिकिलो यासह शेंगा चिक्की, तिळाची चिक्की, शेंगा लाडूहि बाजारात उपलब्ध झाले आहेत. यासोबतच विविध प्रकारचे तिळगुळाचे डबेही उपलब्ध झाले आहेत.