बेळगाव महांतेशनगर येथील कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी लिमिटेड या बँकेत चोरी केल्याप्रकरणी माळमारुती पोलीसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडील 22 लाख 51 हजार 650 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुजफ्फर मोहम्मद शेख (रा. सुभाषनगर, दांडेली) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. गेल्या 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री महांतेशनगर बेळगांव येथील कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी लिमिटेड या बँकेत चोरी करून चोरट्यांनी बँकेच्या तिजोरीतील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली होती.
याप्रकरणी गोकुळनगर मुतगा येथील नरेंद्र बसवराज बेळगावी यांनी माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
याप्रकरणी शोध कार्य हाती घेऊन पोलिसांनी अवघ्या आठवड्याभरात सुभाषनगर दांडेली येथील रहिवासी मुजफ्फर मोहम्मद शेख याला अटक करून चौकशी केली. तसेच त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे बँकेतून चोरलेले 15 लाख रुपये किमतीचे 301 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1 लाख 1 हजार 650 रुपयांची रोकड आणि चोरीसाठी वापरलेली 6 लाख 50 हजार रुपये किमतीची हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल ताब्यात घेतली आहे. या पद्धतीने एकूण 22 लाख 51 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव कंबार आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह निरीक्षक होनप्पा तलवार, एएसआय दंडगी, एम. जी. कुरेर, के. बी. गुराणी, जी. एन. भोसले, एम. एल. मुशलपुरे आदींचा उपरोक्त पोलीस कारवाईमध्ये सहभाग होता. या सर्वांचे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आणि पोलीस आयुक्त डॉ त्यागराजन यांनी अभिनंदन केले आहे.