खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित तालुक्यातील सुमारे 250 हून अधिक नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित सर्व ग्रा. पं. सदस्यांनी हाक माराल त्यावेळी आम्ही समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाही दिली.
खानापूर येथील बेळगाव -पणजी महामार्गावरील लोकमान्य भवन येथे झालेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील हे होते. यावेळी व्यासपीठावर जि. पं. सदस्य जयराम देसाई, नारायण कार्वेकर मुरलीधर पाटील नारायण लाड नारायण पाटील महादेव घाडी व विलास बेळगावकर उपस्थित होते. प्रारंभी समितीचे कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी सर्वांचे स्वागत, तर शहर अध्यक्ष विवेक गिरी यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील, नारायण रामा गांवकर, महेश इराप्पा घाडी, छाया संदीप चौगुले, सुधा गोपाळ गावडा, सुधीर रामचंद्र गुरव, रूक्मान्ना झुंजवाडकर आदींसह खानापूर तालुक्यातील सुमारे 250 हून अधिक नूतन ग्रा. पं. सदस्यांचा भगवा फेटा बांधण्यासह शाल श्रीफळ आणि पानविडा देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून ग्रा. पं. सदस्यांनी आपल्या प्रभागाच्या आणि गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ राहून प्रत्येक आंदोलनात समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी व्यासपीठावरील वासुदेव चौगुले, विलास बेळगावकर, मुरलीधर पाटील आदींनी आपले समयोचित विचार व्यक्त केले. आपल्या मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणात माजी आमदार दिगंबर पाटील यांनी प्रत्येक ग्रा. पं. सदस्यांनी आपल्या गावचा सर्वांगिण विकास साधण्याबरोबरच मराठी भाषा, संस्कृती आणि सीमा प्रश्नासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खानापूर तालुका म. ए. समितीचे सचिव आप्पासाहेब दळवी यांनी केले. कार्यक्रमास निमंत्रितांनासह हितचिंतक आणि तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.