सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या खानापूर येथील हेल्प फॉर नीडीच्या टीमने आपल्या शववाहिकेद्वारे आज मलप्रभा नदी पात्रात आढळलेला एका अनोळखी महिलेचा मृतदेह हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्यास पोलिसांना सहकार्य केले.
खानापूर नजीक मलप्रभा नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती आज सकाळी खानापूर पोलिसांना मिळाली. तेव्हा त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन नदीकाठावर तरंगणारा अज्ञात महिलेचा मृतदेह पात्राबाहेर काढला.
मृत महिलेच्या उजव्या हातावर मारुती शंकर असे कांहीतरी गोंदलेले असून बरेच गोंद काम केलेले आहे. मृतदेह बाहेर काढून पंचनामा वगैरे केल्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हॉस्पिटलपर्यंत कसा न्यायचा हा प्रश्न होता. तेंव्हा खानापूरचे पोलीस उपनिरीक्षक बसवगौडा पाटील यांनी खानापूर येथील हेल्थ फॉर नीडीचे प्रमुख विवेक गिरी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
पोलिसांचा फोन येताच विवेक गिरी यांनी आपला मुलगा सागर गिरी आणि सरकारी रोबर्ट गोन्साल्विस यांच्यासह हेल्प फॉर नीडीची शववाहिका घेऊन तात्काळ नदीकाठाकडे धाव घेतली. तसेच शववाहिकेतून महिलेचा मृतदेह खानापूर सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचविला. खानापूर हेल्थ फॉर नीडीच्या या मदतीबद्दल पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी विवेक गिरी यांना धन्यवाद दिले आहेत.
दरम्यान सदर मयत महिलेबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी खानापुर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन हेल्प फॉर नीडचे खानापूर प्रमुख विवेक गिरी यांनी केले आहे. खानापूर येथे अलीकडेच हेल्प फॉर नीडीची शाखा सुरू झाल्यानंतर त्यांनी राबवलेला हा पहिलाच उपक्रम आहे. याबद्दल हेल्प फॉर नीडीच्या पथकाची प्रशंसा होत आहे.