१७ जानेवारी रोजी पाळण्यात येणाऱ्या हुतात्मा दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. या वक्तव्यानंतर सीमाभागासह संपूर्ण राज्यात कन्नड संघटना आणि नेत्यांचा थयथयाट सुरु झाला असून आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीही या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करून टीका केली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे दुःखदायक असून कर्नाटकातील शांत आणि सुव्यवस्थित असलेल्या या वक्तव्यामुळे गालबोट लागण्याची शक्यता असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संगःच्या तत्वानुसार आदर्श ठेवावा, असा सल्ला मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ट्विट करून दिला आहे.
सीमाभागातील मराठी जनता कर्नाटकी अत्याचाराला कंटाळली आहे. अनेकवेळा अनेक मागण्यांसाठी धडपणाऱ्या मराठी जनतेला कोणताच प्रतिसाद कर्नाटकी प्रशासन देत नाही. याची जाणीव महाराष्ट्राला असून महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला याची माहिती आहे. याचसाठी महाराष्ट्र कर्नाटकव्याप्त मराठी सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यासाठी न्याय लढा देत आहे. परंतु माझं ते माझं आणि दुसऱ्याचं ते हि माझं! अशी भावना असणाऱ्या कर्नाटकाकडून याला विरोध करण्यात येतो आणि मराठी भाषिकांवर दडपशाहीदेखील करण्यात येते.
सीमाभागाची परिस्थिती येडियुराप्पांना चांगलीच माहित असून देखील उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर त्यांनी ट्विट करून असे म्हटले आहे कि, कर्नाटकात मराठी आणि कन्नड भाषिकांत सौहार्दाचे वातावरण आहे. कर्नाटकात मराठी जनता आणि महाराष्ट्रात कन्नड जनता सामंजस्यांने जगत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकातील शांतता बिघडली असून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत असल्याचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे. सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम असून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या नावावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाची शांतता बिघडवू नये, असे देखील ट्विट मध्ये नमूद केले आहे.