कणबर्गी भागातील शेतशिवारात रात्रीच्या वेळी जनावरे चरण्यासाठी सोडण्यात येत आहेत. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पिकांचे संरक्षण व्हावे आणि जनावरे शेतात चरायला सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करुन शेतकर्यांचे रक्षण करण्यात यावे, अशी मागणी घेऊन कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी जनावरे घेऊन कणबर्गी क्रॉसवर जोरदार निदर्शने केली.
यासंदर्भात कित्येकवेळा निवेदन देण्यात आली आहेत. निवेदन सादर करूनही कणबर्गी येथील शेतशिवारात चरण्यासाठी जनावरे सोडणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शिवाय या मागणीकडे बेळगाव महानगर पालिका आणि जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी कणबर्गी क्रॉस येथे जोरदार आंदोलन केले. महानगर पालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्या दुर्लक्षाचा आणि नाकर्तेपणाचा विरोध करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
जनावरांना रात्री बेरात्री अचानकपणे शेतशिवारात सोडण्यात आल्यामुळे आपल्या शेतातील पिके नष्ट होत आहेत. हि पिके नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी कणबर्गी भागातील शेतकऱ्यांनी अनेकवेळा महानगर पालिकेला निवेदन सादर केले आहे. परंतु अद्यापयावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष पुरवून याभागाची पाहणी करावी, आणि दोषींवर कठोर कारवाई करावी असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांनी केले. या प्रकरणी तातडीने लक्ष न पुरवल्यास रास्त रोको करण्याचा इशारा देण्यात आला.
आंदोलनस्थळी बेळगाव महानगर पालिकेचे आयुक्त जगदीश के.एच. यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले कि, जनावरे, डुक्कर, कुत्री आणि इतर प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी पालिकेची आहे हे मान्य आहे. शेतात रात्रीच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या जनावरांच्या प्रश्नी तातडीने लक्ष पुरवून दोषींवर कारवाई केली जाईल. आजपासूनच या भागात पथक नेमून पाहणी करून कारवाईला सुरुवात होईल. तसेच याप्रकरणात सहभागी असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आंदोलन स्थळी माळमारुती सीपीआय सुनील पाटील यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. या आंदोलनात शेतकरी नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर, मुरुगेंद्रगौडा पाटील, सुधीर गड्डे , संजय इनामदार, राघवेंद्र गौडा पाटील आदी सहभागी झाले होते.