कर्नाटकात कांही ठिकाणी कावळे आणि सारस पक्ष्यांचे अचानक मृत्यू झाल्याने बर्ड फ्लूचा संशय निर्माण झाला आहे. परिणामी बेळगावसह 10 जिल्ह्यांमध्ये बाहेरील राज्यातून कोंबड्या आणण्यावर निर्बंध लादण्यात आला आहे.
मृत पक्षांचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले असून बर्ड फ्लूचे निदान झाल्यास राज्यात चिकन विक्री आणि चिकनचा राज्याबाहेर होणारा पुरवठा बंद केला जाणार आहे.
सध्या बेळगावसह गुलबर्गा रायचूर, यादगिरी, मंगळूर, बळ्ळारी, म्हैसुर आदी जिल्ह्यांमध्ये बाहेरील राज्यातून कोंबड्या आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व जिल्ह्यांच्या सीमेवर बाहेरील राज्यातून कोंबड्या घेऊन येणार्या वाहनांची तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे संबंधित वाहनांवर जंतू नाशकाची फवारणी केली जात आहे.
आतापर्यंत राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार झाल्याचे दिसून आलेले नाही. तथापि मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 30 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून काटेकोर उपाययोजना करून खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.