रविवार दिनांक 17 जानेवारी होणार हुतात्मादिन सीमावासीयांनी गांभीर्याने पाळावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना बेळगाव जिल्हा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनात १७ जानेवारी १९५६ रोजी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी 17 जानेवारी 2021 रोजी सकाळी नऊ वाजता हुतात्मा चौक रामदेव गल्ली येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.
याचप्रमाणे बेळगाव जिल्हा शिवसेना कार्यालयात जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत दि. 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्याचा निर्णय बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने बैठकीत घेण्यात आला.
दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता कंग्राळी खुर्द येथे उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर हुतात्मा चौक बेळगाव येथे उपस्थित राहून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
तसेच हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सीमावासीयांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. बैठकीला शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, उप तालुका प्रमुख पिराजी शिंदे, शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, प्रकाश राऊत, जिल्हा संघटक रवींद्र जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक दत्ता जाधव, राजू कनेरी यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते.