सीमाभाग महाराष्ट्रात आणण्यास कटिबद्ध असल्याचे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना कर्नाटकची इंचभर जागादेखील महाराष्ट्राला मिळणार नाही. उलट त्यांचे सोलापूर व सांगली प्रदेश कर्नाटकात सामील करून घेऊ, अशी दर्पोक्ती कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, कर्नाटक -महाराष्ट्र सीमाप्रश्नी आमची बाजू सिद्ध झाली आहे. आमच्या राज्याची भूमी आम्ही सोडणार नाही. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर आणि सांगलीमध्ये कन्नड भाषिक बहुसंख्येने आहेत. त्यामुळे ते भाग कर्नाटकात समाविष्ट करून घेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगून बेळगाव परिसरातील मराठी भाषिकांनी शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ते कर्नाटकचे आहेत असे वाटत नाही, असे बोम्मई म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सीमाप्रश्नी अनावश्यक बोलत आहेत. कर्नाटक -महाराष्ट्र सीमा प्रश्न केंव्हाच सुटला आहे. सीमाप्रश्नी महाजन अहवाल अंतिम आहे. संसदेने देखील ते मान्य केले आहे. तेंव्हा वादग्रस्त अनावश्यक वक्तव्य करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगावची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संविधानाच्या विरोधात बोलताहेत. ठाकरे यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडला असून राजकीय स्वार्थासाठी ते असे बोलत आहेत. सोलापूर आणि सांगली कर्नाटकात विलीन व्हावे यासाठी आम्ही महाजन अहवालाचा आधार घेणार आहोत तसेही गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.