कुद्रेमानी व बेळगुंदी सीमावर्ती भागात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बेळगाव वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळ ठोकून बिबट्याच्या हालचालीवर करडी नजर ठेवली आहे. बिबट्याचा वावर कर्नाटक पेक्षा महाराष्ट्र हद्दीत जास्त असला तरी वनखात्याने त्याला जेरबंद करण्यासाठी सापळे लावण्याच्या स्वरूपात संपूर्ण तयारी केली आहे.
कुद्रेमानी व शिनोळी दरम्यान असणाऱ्या माळावर गेल्या मंगळवारी सकाळी फिरावयास गेलेल्या आकाश घोरपडे यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी बिबट्याच्या वावराचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
ही माहिती मिळताच चंदगड विभागाच्या वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. तेंव्हा त्या ठिकाणी त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आणि विष्ठा आढळून आली होती. त्यामुळे सीमावर्ती भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, खबरदारी म्हणून बेळगाव वनविभागाने कुद्रेमानी, बेळगुंदी व सोनोली परिसरात आपला तळ ठोकला आहे. बिबट्याचा वावर कर्नाटक हद्दीपेक्षा महाराष्ट्रातील जंगल भागात अधिक असल्याचे दिसून आले आहे.
तथापि कर्नाटकाच्या हद्दीत बिबट्या आढळून आल्यास त्याला जेरबंद करण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे. यासाठी ठराविक ठिकाणी पिंजऱ्याच्या स्वरूपात सापळे लावण्यात आले आहेत. उपवनक्षेत्रपाल विनय गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याचे पाच -सहा जणांचे पथक सध्या बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेवर आहे.