महानगरपालिकेसमोर अनधिकृतरित्या फडकविण्यात आलेल्या लाल-पिवळ्या झेंड्याचा मुद्दा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीसह समस्त मराठी जनतेने उचलून धरला असून अनधिकृत आणि बेकायदेशीर कृत्यावर प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलून कारवाई करावी, यासाठी रेटा लावण्यात आला असतानाच स्वयंघोषित कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्याने भीतीपोटी पळपुटा डाव आखला आहे.
कायदा हा सर्वांसाठी समान आहे. यामुळे घडलेल्या प्रकारावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यासाठी मराठी जनतेची जोरदार मागणी होत आहे. महानगरपालिकेसमोर हा झेंडा फडकाविणाऱ्या श्रीनिवास ताळूकर याने नवा ‘कर-नाटकी’ डाव आखला असून आपल्या घराला शुक्रवारी आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार त्याने केली आहे. या माध्यमातून केवळ मराठी आणि कन्नड वाद निर्माण व्हावा, हाच उद्देश ताळूकर या कार्यकर्त्याचा असल्याचे स्पष्ट होत आहे.
शहरातील चन्नम्मा सर्कल येथील राणी चन्नम्मा पुतळ्याजवळ असणारा लाल – पिवळा झेंडा स्तंभासह गायब झाला होता. याचे खापरही मराठी भाषिकांवर फोडण्याचा प्रयत्न झाला. मराठी भाषिकांकडून झेंडा हटविण्यात आला असल्याचा टाहो कन्नड संघटनांनी फोडला. मात्र पोलिसांनी या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून फुटेज तपासून हा केवळ अपघात असल्याचे निदर्शनास आणले. आणि यावेळीही कन्नड संघटनांना चपराक बसली.
महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेल्या लाल – पिवळ्या झेंड्याप्रकरणी कन्नड संघटनांकडून ताळूकरचा सत्कार होत आहे. परंतु मराठी भाषिक जनतेतून याबाद्दक तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ताळूकर याचे घर वडगावमधील मलप्रभानगर येथे असून घराच्या दर्शनी भागात किराणा दुकान आहे. झेंड्याच्या वादातून आपल्या दुकानाला पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती त्याने कन्नड प्रसारमाध्यमांना दिली आहे. शहापूर पोलीस घटनास्थळाहून माहिती घेत असून याबाबतीत अधिक तपास करत आहे. परंतु हा सारा प्रकार म्हणजे पळपुटेपणाचा डाव असल्याचेच बोलले जात आहे.
महानगरपालिकांसमोर फडकविण्यात आलेल्या लाल – पिवळ्यासंदर्भात प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. हा झेंडा प्रशासनाकडून हटविण्यासाठी हालचाली सुरु आहेत. पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यासंदर्भात निर्णय घेणार असून या साऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ताळूकरने आतापासूनच ‘कर-नाटकी’ डाव सुरु केले आहेत.