बुधवार (दि. २७ जानेवारी) रोजी महाराष्ट्रात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या सीमाप्रश्नावरील भाषणानंतर कर्नाटकातील नेत्यांचा तिळपापड होत असून या भाषणावर आता कर्नाटकी नेत्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सीमाप्रश्नी महाजन अहवाल अंतिम असून महाराष्ट्रातील नेत्यांनी यावर कोणत्याही प्रकारचे विधान करून कर्नाटकात मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये वाद घडवून आणू नयेत, असे वक्तव्य कुमारस्वामी यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविषयी वक्तव्य केले. तसेच हा वाद सर्वोच्च नायायालयात असूनही कर्नाटक सरकार न्यायालयाचा अपमान करत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकी नेत्यांचा जळफळाट होत असून कर्नाटकातील सीमाभागात मराठी आणि कन्नड बांधव हे बंधुप्रेमाने राहत असून महाराष्ट्रातील नेत्यांनी यांच्यामध्ये विष पेरण्याचे काम करू नये, असा फुकटचा सल्लादेखील दिला आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेले अन्याय हे सर्वश्रुत आहेत. मराठी भाषिकांवर होत असलेली दडपशाही आणि कायद्याच्या नावाखाली करण्यात येत असलेला दुजाभाव हा जगजाहीर आहे. परंतु कर्नाटक सरकारचे हे बिंग कुठेही बाहेर पडू नये, यासाठी आता कर्नाटकी नेत्यांचा आटापिटा सुरु झाला आहे. कुमारस्वामींनी ट्विट करून केलेले हे भाष्यदेखील याचाच एक प्रकार आहे. परंतु सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी आता महाराष्ट्रातील प्रत्येकजण खंबीर पाने उभा असून, अशा पोकळ भाषणांना आता मराठी माणूस कदापि भीक घालणार नाही, हे मात्र नक्की.