महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेत्यांनी सीमाभागातील मराठी बांधवाना दिलेल्या पाठिंब्यानंतर कर्नाटकातील तमाम नेतेमंडळींसह कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांचा तिळपापड होत आहे. याप्रकरणात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी आता नवा जावईशोध लावला असून छत्रपती शिवराय यांचे मूळ कन्नड आणि कर्नाटकातील असून बेळगावमधील मराठी जनता हि कन्नडचे असल्याचा दावा केला आहे. या अगोदर आणखी एक उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई कर्नाटकाची असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
महाराष्ट्रात सीमाप्रश्नावर आधारित प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकी अत्याचार आणि सीमाप्रश्नासंदर्भात रोखठोख भाषण केले. हे भाषण कर्नाटकातील नेत्यांना इतके झोंबले कि त्यानंतर सर्वच नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आगपाखड सुरु केली आणि सीमाभागातील मराठी जनतेविषयी सवतीच्या भावाची कर नाटकी विधाने करण्यास सुरुवात केली.
बेळगावमध्ये प्रवासी मंदिरात आलेल्या गोविंद कारजोळ यांनीही अशाचप्रकारचे निरर्थक वक्तव्य केले असून प्रसारमाध्यमांसमोर बेळगावच्या मराठी जनतेचे आणि कन्नड भाषिक जनतेचे संबंध बंधुप्रेमाचे असल्याचे म्हटले आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांच्यावरही तोंडसुख घेतले आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे अस्थिर असून काँग्रेसच्या पाठिंब्याने उभे असलेले सरकार आहे. काँग्रेस कधी आपला पाठिंबा काढून घेईल, आणि आपली खुर्ची कधी जाईल, याची धास्ती ठाकरेंना आहे. यासाठी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सीमाप्रश्नाचा मुद्दा चघळला जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
उद्धव ठाकरेंना इतिहास माहित नाही. त्यांनी तो समजून घ्यावा. छत्रपती शिवराय यांचे मूळ गदग जिल्ह्यातील असून ते मूळचे कर्नाटकी आहेत. महाराष्ट्रात जाऊन त्यांनी आपले राज्य निर्माण केले. सीमाभागातील मराठी भाषिकदेखील मूळचे कन्नडचे आहेत. येथे कोणतीही भाषा समस्या नाही. भाषावाद आणून सीमाभागातील जनतेच्या भावना दुखावू नये आणि येथील वातावरण बिघडवू नये, असा फुकटचा सल्ला देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
कर्नाटकातील नेतेमंडळी आता मराठी भाषिकांच्या बाजूने इतक्या विचित्र प्रतिक्रिया देत आहेत, कि त्यांच्या बोलण्यावरून मराठी भाषिकांना कोणत्याही प्रकारची चुकीची वागणूक प्रशासन देत नाही, असे जाणवत आहे. परंतु कर्नाटकी प्रशासनाचा मराठी भाषिकांबाबत असलेला दुजाभाव सर्वश्रुत आहे. कर्नाटकी अत्याचाराचे सर्व दाखले जगभर पसरतील, कदाचित या भीतीपोटी आता कर्नाटकी नेते उलट्या पावलांनी पळ काढत असल्याचे चित्र जाणवत आहे.